हिंगोली- राज्यातील विधान परिषद जागा संदर्भात निवडणूक जाहीर झाली असताना काँग्रेसकडून डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे महासचिव केसी विनू गोपाल यांनी पत्र जारी केले आहे.
विद्यमान कार्यकाळात प्रज्ञाताई सातव यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता. राज्यात जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत याबद्दल चर्चा सुरू होती. त्यातच विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञाताई सातव यांच्या विरोधात काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार करीत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विरोधकांना सहकार्य केल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे मोठी राजकीय चर्चा सुरू झाली होती. यामध्ये सातव यांची विधान परिषदेची उमेदवारी रद्द होण्याची देखील चर्चा सुरू होती. परंतु आज महासचिव के.सी. वेणूगोपाल यांनी पत्र जारी करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनुसार विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावास मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे. सातव यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यामुळे येणाऱ्या विधानसभेत त्या दावेदार नसणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कळमनुरी विधानसभेमध्ये पुन्हा वेगळ्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत गटातटाचे राजकारण अधिक बळवण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. पक्षीय बलाबल पाहता सातव यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उसाचे वातावरण पहावयास मिळत आहे.












