हिंगोली- अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या गळाला भाजपचा आणखी एक उमेदवार लागला असून सदर उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांचे पेव फुटले असताना गुरुवारी भारतीय जनता पार्टीच्या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्या पाठोपाठ शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 17 अ मधील उमेदवार गजानन काशीराम सोनुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निमित्ताने शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली असून शनिवारपासून आणखी राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे.












