हिंगोली : राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते यांचा हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करून जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांबाबत त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या वेळी हिंगोलीकरांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित विविध मागण्या पुढे करण्यात आल्या.
समितीच्या वतीने हिंगोलीहून मुंबईकडे जाणारी दैनंदिन रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच अमरावती–पुणे या रेल्वे गाडीचा प्रवास वेळ कमी करून ती प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने नव्याने वेळापत्रकबद्ध करावी, अशी मागणीही मांडण्यात आली. यासोबतच नागपूर – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे जाण्यासाठी दैनंदिन रेल्वे गाडी सुरू करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी खासदार रामरावजी वडकुते यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. “मी खासदारकीची शपथ घेण्यापूर्वीच हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यावश्यक असलेल्या रेल्वे सेवांबाबत तुमच्या मागण्या समजल्या आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन तातडीने प्रयत्न करणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी रेल्वे संघर्ष समितीचे नंदकिशोर तोष्णीवाल, वसंत भट, गोवर्धन अण्णा वीरकुंवर, शेख नईमभाई, सुनील मानका, खलील बेलदार, रवींद्र सोनी आणि गोविंद प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्याच्या रेल्वे सुविधांबाबत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांना या बैठकीमुळे नवी दिशा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.












