हिंगोली – महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसात हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी अष्टीकरांना उमेदवारी देऊ नये असा तगादा लावला होता. त्यानंतरही अष्टीकराना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले असून याचा परिणाम अष्टीकरांना भोगावा लागू शकतो.
महाविकास आघाडीमध्ये हिंगोलीची जागा कोणाकडे राहील आणि उमेदवार कोण असेल ? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्क वितर्क सुरू होते. काँग्रेसकडून आमदार प्रज्ञाताई सातव, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांची नावे चर्चेत होती. उद्धव ठाकरे गटामधून माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह अनेकांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. शिवाय दरवेळी जिल्ह्याच्या बाहेरी उमेदवार लादण्यात येतो यावेळी तरी जिल्ह्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केले होती. त्या पार्श्वभूमीवर आज नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध उपरा असा वाद उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये उफाळून आला आहे. ऐन निवडणुकीत निर्माण झालेल्या वादामुळे अष्टीकर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम मतदानावर होणार असल्यामुळे आष्टीकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.












