हिंगोली – लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून ऐन वेळी उमेदवारी जाहीर झालेल्या बाबुराव कदम यांना तब्बल एक लाख मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवाची विविध कारण मिमांसा सुरू असून न्यूज माध्यमच्या विश्लेषणामध्ये पुढील दहा कारणांमुळे महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले.
1) ऐनवेळीची उमेदवारी
विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून ऐनवेळी बाबुराव कदम यांना उमेदवार म्हणून जनतेसमोर उभे करण्यात आले. हादगाव विधानसभा क्षेत्र वगळले तर बाबुराव कदम हे नाव देखील इच्छुक म्हणून सुद्धा चर्चेत नव्हते. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलून कदम यांना उमेदवारी देणे हा प्रकार महायुतीला घातक ठरला.
2) स्वतःच्या पक्षाची यंत्रणा नाही
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःच्या पक्षाची भक्कम अशी यंत्रणा उभी केली नाही. ज्याचा फटका या लोकसभा निवडणुकीत दिसून आला. हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तुल्यबळ नेते आणि झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी दिसून आली नाही.
3) भाजप भरोसे काम
मागील तीन- साडेतीन वर्षांपासून भाजपच्या वतीने संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मोठी संघटन यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. हीच संघटन यंत्रणा आपल्या कामी येईल असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांना होता. प्रत्यक्षामध्ये मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाबुराव कदम यांच्या प्रचारातून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. भाजपाची भाजपचे जे कार्यकर्ते नेहमी सोशल मीडियावर आक्रमक असायचे असे बहुतांश कार्यकर्ते या निवडणुकीत शांत असल्याचे दिसून आले.
4) नियोजन शून्यता
बाबुराव कदम यांच्या प्रचाराची धुरा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्यावर होती. परंतु प्रत्यक्षात प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन दिसून आले नाही. सोबतच्या मित्र पक्षाचे नेत्यांनी सोशल मीडियावर दिवसभराच्या दौऱ्याचे वेळापत्रक टाकून दौरा पूर्ण करण्याचे सोपस्कार पार पाडले. परंतु शिंदे गटाकडून मात्र या व्यतिरिक्त प्रचाराच्या अनुषंगाने व्यापक नियोजन दिसून आले नाही. बूथप्रमुखांना योग्य सन्मान देखील न मिळाल्याचा फटका कदम यांना बसला.
5) दिग्गज नेत्यांच्या सभा फेल
बाबुराव कदम यांच्या प्रचाराकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही दिग्गज नेत्यांनी लोकसभा क्षेत्रात सभा घेतल्या. परंतु या सभांना दखलपात्र गर्दी देखील जमवता आली नाही. ज्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मतदारांमध्ये देखील त्याचा प्रभाव पडला. दिग्गज नेत्यांच्या सभांना गर्दी होत नसेल तर उमेदवाराच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.
6) मोदी फॅक्टर चालला नाही
महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन जोरदार प्रचार करण्यात आला. परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये मोदी फॅक्टर चालला नाही. याव्यतिरिक्त स्थानिकचे मुद्दे आणि जातीपातीचे राजकारण यालाच प्राधान्य मिळाल्याचे दिसून आले.
7) मराठा आणि मुस्लिम नाराजी भोवली
आरक्षणावरून सरकारच्या विरोधात निर्माण झालेला असंतोष यामुळे मराठा समाजाचे विरोधात गेलेले मतदान आणि दरवेळेस पेक्षा सरासरीने अधिक झालेले विरोधातील मुस्लिम मतदान या दोन गोष्टी महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात घातक ठरल्या. गठ्ठा स्वरूपाचे असलेले हे मतदान महायुतीला अपेक्षित नसले तरी मुस्लिम मतदारांनी अतिशय कट्टरतेने महायुतीच्या विरोधात मतदान केल्याने आष्टीकरांचा मतदानाचा आलेख वाढता झाला.
8) वंचित बहुजन आघाडीचा फटका
वंचित बहुजन आघाडी कडून बि.डी. चव्हाण लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. वंचितच्या माध्यमातून दलित मतदान विभाजन होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसेल ज्याचा अप्रत्यक्ष फायदा महायुतीला होईल असा अंदाज लावल्या जात होता. परंतु प्रत्यक्षामध्ये बि.डी. चव्हाण ज्या बंजारा समाजातून येतात त्या समाजातील मतदारांचा सर्वाधिक कल आधी हा महायुतीकडे होता. परंतु चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे कळमनुरी, औंढा, वसमत व हिंगोली तालुक्यातील बहुतांश मतदान हे वंचित बहुजन आघाडीकडे गेले. ज्याचा अप्रत्यक्ष फटका बाबुराव कदम यांना बसला. उमरखेड भागातील बंजारा समाज मात्र अष्टीकरांच्या पारड्यात पडल्याने दोन्ही बाजूने अष्टीकरांचा फायदा झाला.
10) अतिआत्मविश्वास
निवडणुकीच्या दरम्यान निर्माण होत असलेल्या परिस्थिती संदर्भात अनेकांनी महायुतीच्या नेत्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिआत्मविश्वासामध्ये या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचबरोबर उमेदवार बाबुराव कदम यांनी सोबत घेतलेल्या काही नेत्यांसंदर्भात जनतेमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे या नेत्यांच्या बद्दलची नाराजी बाबुराव कदम यांच्या विरोधात गेली आणि त्याचा देखील खूप मोठा फटका या निवडणुकीत बाबुराव कदम यांना सहन करावा लागला.












