हिंगोली- लोकसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आघाडी विरोधी भूमिका घेऊन विरोधकांना सहकार्य केल्याचा आरोप करीत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव वेणू गोपाल यांच्याकडे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या मित्र पक्षांची भूमिका स्पष्ट असताना प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या भूमिके विरोधात काम केले. जे इंडिया आघाडीच्या धोरणाच्या विरोधात होते. निवडणुकीदरम्यान विरोधकांच्या निर्देशानुसार काम करीत सातव यांनी वंचित बहुजन आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे काम केले. त्यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय निवडणूक प्रचारादरम्यान सातव यांनी कुठल्याही प्रचार रॅलीमध्ये सहभाग नोंदविला नाही. आघाडीच्या भूमिके विरोधात काम करणाऱ्या सातव यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यातील आघाडीचे संबंध कायम ठेवले जातील अशी मागणी देखील त्यांनी वेणू गोपाल यांना सादर केलेल्या तक्रारीत केली आहे. अष्टीकरांच्या या तक्रारीमुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. शिवाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभेची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला सोडवून घेण्याच्या अनुषंगाने सातव यांच्या निवडणुकीतील भूमिकेचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.












