हिंगोली – माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य शासनाने हळद संशोधन प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्रीपदाचा पदाची संधी बहाल केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेमंत पाटील यांना थेट राज्यमंत्रीपदाची संधी दिल्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला असून काही जणांची धाकधूक ही वाढली आहे.
हिंगोली लोकसभेचे खासदार असताना जनसंपर्काचा अभाव व इतर अनेक कारणे चर्चेला आणून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी अनेक राजकीय दिग्गज कामाला लागले होते. यामध्ये त्यांचे काही निकटवर्तीय देखील सक्रिय झाले होते. ज्यांनी पडद्यामागून कारस्थान रचले. परिणामअंती ऐन वेळेवर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने त्यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नी राजश्रीताई पाटील यांना वाशिम लोकसभेत उमेदवारी जाहीर केली. या क्षेत्रात देखील वेळ कमी असल्यामुळे हेमंत पाटील यांनी दिवस-रात्र एक केला. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेच्या निकालानंतर हेमंत पाटील लोकसभा क्षेत्रात फारसे दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यातील राजकारण संपले अशा प्रकारच्या कल्पना देखील लढविल्या जाऊ लागल्या. परंतु ऐनवेळी उमेदवारी बदलून हेमंत पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत अखेर एकनाथ शिंदे यांनी जाणीव ठेवून त्यांना वसमत येथे उभारल्या जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. त्यांच्या या निवडीमुळेच एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात हेमंत पाटलांचे स्थान अधोरेखित झाले आहे. शिवाय हिंगोली लोकसभा क्षेत्रातील या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून देखील यापुढे हेमंत पाटीलच राहतील असा सूचक इशारा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांची जिल्ह्यातील व लोकसभा क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्हा करिता महाराष्ट्र व राष्ट्र पातळीवर महत्त्वाचा असणारा हळद संशोधन प्रकल्प यापुढे अधिक गतीने मार्गी लागेल अशी आशा देखील निर्माण झाली आहे. तसेच हेमंत पाटील समर्थकांना देखील यामुळे मोठे बळ मिळाले आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांच्या राज्यमंत्रीपदाच्या दर्जामुळे लोकसभेत त्यांचे जवळचे हितचिंतक (?)असणाऱ्यांना मात्र कायमची धाकधूक राहणार आहे हे देखील यावरून स्पष्ट होत आहे.












