हिंगोली- विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हाध्यक्ष बि.डी. बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत सूचकपणे महायुतीतील काही नेत्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागामध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या शाळा व सभागृहास जाण्याकरिता मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात काहीजणांनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बि.डी. बांगर यांनी केला आहे. यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारास काहीजणांनी धमक्या देऊन सदरील काम न करण्याचे बळी पाडल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर जर असा अन्याय होणार असेल आणि विकास कामे थांबविण्याचा प्रकार होत असेल तर यापुढे मला सर्व काही जाहीरपणे सांगावे लागेल. शिवाय असे प्रकार मी सहन करणार नाही. यासंदर्भात पुढील भूमिका घेण्यापूर्वी पक्षाचे अध्यक्ष अजित दादा यांच्यासमोर सर्व विषय मांडले जातील असे देखील बांगर यांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर पालकमंत्री महोदयांकडून विकासकामांना मंजुरी मिळत आहे. परंतु काही जणांना ही बाब सहन होत नसल्यामुळे सदरील कामे कशा पद्धतीने थांबवता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा व्यक्तींनी वेळीच सावध व्हावे अन्यथा मला तोंड उघडावे लागेल अशी प्रतिक्रिया देखील बि.डी. बांगर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष केशव दुबे, हकीम बागवान, युवक अध्यक्ष सुजय देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती.












