हिंगोली – शहरातील हिंगोली नगरपरिषद तथा जिल्हा परिषद मार्गावर सुशोभीकरण करून बसविण्यात आलेल्या सूर्यनमस्कार पुतळ्यांची विकृत व्यक्तीकडून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हिंगोली नगर परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद मार्गावर असलेल्या दुभाजकावर सुशोभीकरणांतर्गत सूर्यनमस्कार पुतळे बसविण्यात आले होते. पहाटेच्या समयी या मार्गावर शहरातील अनेक नागरिक चालण्यासाठी येतात. त्या अनुषंगाने सूर्यनमस्कार पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांना योग अभ्यास करता यावा तसेच सौंदर्यकरण व्हावे या दृष्टीने पालिकेच्या वतीने सूर्यनमस्कार पुतळे बसविण्यात आले होते.


परंतु गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या पुतळ्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. शहरातील विकृत समाजकंटकांच्या मार्फत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. या संदर्भात पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतीत नगरपालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.












