हिंगोली- काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी त्यांच्यावर घाणाघाती टीका करताना खोक्याच्या राजकारणातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार प्रज्ञाताई सातव यांचा आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पार पडला. या प्रवेशाच्या नंतर हिंगोली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी प्रज्ञाताई सातव यांच्यावर जोरदार टीका केली. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने सहानुभूतीने विचार करून अनेकांना डावलून प्रज्ञाताई सातव यांना एक नव्हे तर दोन वेळा विधान परिषदेची संधी दिली. त्यांचे स्वतःचे काहीही कर्तृत्व नसताना केवळ राजीव सातव यांनी दिलेल्या योगदानाच्या व सहानुभूतीच्या विचारावर पक्षाने त्यांना दोन वेळा आमदार केले. असे असतानाही केवळ विधान परिषदेमधील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ कमी करून विरोधी पक्षनेताच राहू नये अशा संविधान विरोधी भूमिकेतून भारतीय जनता पार्टीने प्रज्ञाताई सातव यांचा प्रवेश घडवून आणला. स्वर्गीय रजनीताई सातव, स्वर्गीय राजीव सातव यांच्या आत्म्याला या प्रकारामुळे नक्कीच त्रास झाला असेल. प्रज्ञाताई विकासाच्या मुद्द्यावर प्रवेश केल्याचे सांगत आहेत. पण यामागे यापूर्वी झालेल्या खोक्यांच्या राजकारणाची शक्यता आम्हाला वाटत असल्याचा घनाघाती आरोप कांबळे यांनी केला. त्यांनी पक्षात असताना जिल्हास्तरावर केवळ पक्ष संपविण्याचेच काम केले. परंतु आता त्यांच्या जाण्यामुळे कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून काँग्रेस नव्याने उभारी घेईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला .या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रभारी सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, जकी कुरेशी, रमेश शिंदे, मिलिंद उबाळे, जुबेर मामु यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












