हिंगोली- काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई राजीव सातव यांनी आज मुंबई येथे भाजप कार्यालयात पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सचिवांकडे सादर केला होता.
काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव ह्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षश्रेष्ठींची उपस्थिती होती. यावेळी सातव यांच्यासह शिवाजीराव मस्के (जि.प सदस्य), विलास गोरे जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष,
भागवत चव्हाण तालुकाध्यक्ष कळमनुरी, पंकज जाधव जि.प.सदस्य तथा तालुकाध्यक्ष औंढा नागनाथ, पंजाबराव गडदे सरपंच खेर्डा, नामदेवराव चव्हाण काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, राजेश हेरे तालुका सरचिटणीस कळमनुरी, श्रिनिवास मुंढे पंचायत समिती सदस्य, दाऊद भाई जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, शेख इसराईल हिंगोली तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, केशवराव मस्के पंचायत समिती सदस्य, भगवानराव शिंदे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस , विष्णू मुंढे कळमनुरी तालुकाध्यक्ष ओबिसी विभाग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
विकासाकरिता भाजपमध्ये प्रवेश- सातव
दिवंगत खासदार राजीव सातव यांचे विकासाचे स्वप्न साध्य करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया प्रज्ञाताई सातव यांनी यावेळी दिली. रवींद्र चव्हाण व चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून प्रज्ञा सतव यांचे पक्षात स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.












