हिंगोली – जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात एका वृत्तवाहिनीने खळबळ जनक व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडिओच्या संदर्भात वृत्तवाहिनीने शासकीय विश्रामगृहाचा मद्यपानासाठी वापर करण्यासह अनैतिक कृत्याच्या बाबतीत दावा केल्यामुळे मोठा भूकंप झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कर्मचाऱ्यावर केलेल्या कारवाईच्या नंतर झिरवळ मोठे अडचणीत आले होते. परंतु संबंधित विषयाशी आपला काहीही संबंध नाही. शिवाय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असे जाहीर करत झिरवळ यांनी हात झटकले होते. त्यानंतर लोकशाही तत्वाला मानणाऱ्या एका वृत्तवाहिनीने झिरवळ यांच्या संदर्भात काही व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये झिरवळ हे शासकीय निवासस्थानात असताना मद्यपान करण्यासह अनैतिक कृत्य करत असल्याचा दावा संबंधित वृत्तवाहिनीने केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून येणाऱ्या काळात याबाबतीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












