हिंगोली : मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोली, थवा प्रकाशन आणि क्रांतिकारी शहीद भगतसिंग श्रमिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थवा प्रकाशनाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त गोडाती बबनराव काळे यांच्या ‘धूळवाटेवरचे दिवस’ या कथासंग्रहाचे आणि डॉ. राधिका माणिक देशमुख यांच्या ‘पुरेसे हे अपुरेपण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सराफ बँक्वेट हॉल येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. डॉ. पी. विठ्ठल, भारत सातपुते, राजेंद्र गहाळ आणि प्रा. विलास वैद्य उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून साहित्यिकांनी सामाजिक वास्तवाचे भान ठेवून लेखणीतून वैचारिक क्रांती घडवावी, असा संदेश दिला. ‘धूळवाटेवरचे दिवस’मधील ग्रामीण वास्तवाचे प्रभावी चित्रण तसेच ‘पुरेसे हे अपुरेपण’मधील संवेदनशील अभिव्यक्तीचे विशेष कौतुक करण्यात आले.
गणेश येवले यांनी सूत्रसंचालन, पारिजात देशमुख यांनी प्रास्ताविक, रसिका विडोळकर यांनी मनोगत, तर डॉ. गायत्री दरगू यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हाभरातील साहित्यप्रेमी, कवी, लेखक व वाचकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.












