हिंगोली – जिल्ह्यातील वाळू घाटांमधील वाळू उपसा बंद झाला असला तरी तस्करांनी व घाटाच्या ठेकेदारांनी अनेक ठिकाणी मंजूर क्षमतेपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळूची साठेबाजी केली आहे. त्यातच यामध्ये महसूल विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची भागीदारी असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकवायला मिळत आहे.
जिल्ह्यात वाळूची तस्करी हा नवीन विषय नाही. मागील वर्षी घाटांचे लिलाव पार पडल्यानंतर गेल्या काही महिन्यात तस्करांनी अव्वाच्या सव्वा वाळूचा उपसा केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात डोळेझाक देखील करण्यात आली. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांसह अनेक ठिकाणी भेटी देऊन तस्करी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु महसूल मधीलच एक अधिकारी या ठेकेदार व तस्करांशी हात मिळवणी केल्याची चर्चा आहे. प्रकरण इथपर्यंत थांबले नाही तर अनेक तस्करांनी वाळूचे मोठे साठे करून ठेवले आहेत. काही ठिकाणी घाटाच्या ठेकेदारांनी देखील मर्यादेपेक्षा अधिक वाळूसाठा केला आहे. सदरील वाळू साठा अधिकृत दाखविण्यासाठी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मार्फत साठ्याचे मोजमाप कमी लेखण्यात आले आहे. प्रशासनाच्या नाकावर टिचून अधिकारी आणि ठेकेदार गौडबंगाल चालवत असल्याचा असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकरणात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी लक्ष घालतील काय ? याकडे जिल्ह्यातील लक्ष लागले आहे.












