हिंगोली- पंतप्रधान मोदी यांनी काल राज्यसभेच्या खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी व राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांच्यात मनमोकळ्या गप्पा रंगल्या आणि या गप्पांमध्येच मोदींनी वडकुते त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला.
काल बुधवारी नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतील भाजप खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी व खासदार रामराव वडकुते यांची देखील भेट झाली. या भेटीमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या. वडकुते यांनी थेट मोदींना “तुम्ही खूप कमी झोप घेता असे समजले” असे विचारताच मोदींनी दिलखुलास हसत “होय मी साडेतीन ते चार तास झोप घेतो आणि विशेष म्हणजे मला झोप देखील लवकर लागते” असे उत्तर दिले. यानंतर मोदींनी वडकुते यांना खासदारकीची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना सांगितले की भारतात माझ्यापेक्षा देखील हुशार व्यक्ती आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये देखील अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आहेत. परंतु पंतप्रधान पदाची संधी मला मिळाली आणि त्या संधीला पात्र ठरण्यासाठी मी दिवस-रात्र काम करत असतो. अशीच संधी तुम्हाला देखील मिळाली आहे. भविष्याचा विचार न करता आजच्या वर्तमानात जगताना मिळालेल्या संधीला पात्र ठरण्यासाठी काम करा असा मोलाचा सल्ला देखील मोदींनी वडकुते यांना दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एवढ्या जवळून आणि मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली. याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो अशी प्रतिक्रिया खासदार रामराव वडकुते यांनी दिली.












