हिंगोली- नगर परिषद मार्फत स्व. राजीवभाऊ सातव नाट्यगृहच्या मागच्या बाजूला ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे करिता गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच सदर प्रकल्प हा मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित सुद्धा करण्यात आला आहे. सदर खत निर्मिती प्रकल्पामध्ये नगर परिषद मार्फत घंटागाडीद्वारे वर्गीकृत करून संकलित केलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात येत आहे.तसेच तयार करण्यात आलेले खत हे अत्यंत चांगल्या दर्जाचे असल्यामुळे याची मागणी हि शेतकरी,नागरिक नेहमीच करीत असतात.महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी दारसेवाड यांनी अचानक नगर परिषद अंतर्गत सुरु असलेल्या खत निर्मिती प्रकल्पाला भेट दिली.

सदर प्रकल्पाला भेट देऊन खत निर्मिती प्रकल्पाची तपासणी करण्यात आली आणि सदर प्रक्रीये बाबत सखोल विचारपूस करण्यात आली. प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या खताचे प्रत्यक्ष परीक्षण केले. सदर कामाबाबत समाधान व्यक्त करून मुख्याधिकारी यांचे कौतुक केले. यानंतर अधिकारी यांनी माझी वसुंधरा अभियान 1 मध्ये तयार केलेल्या घनवन अमृतवनची पाहणी केली. तसेच नगर परिषदे मार्फत तयार करण्यात आलेल्या रोप वाटिका आणि बीज बँकेची पाहनी करून आनंद व्यक्त केला.यानंतर त्यांनी नगर परिषद मार्फत तयार करण्यात आलेल्या टर्फ ग्राउंडवर क्रिकेटचा आनंद सुद्धा लुटला.












