हिंगोली- विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठविल्या नंतर देखील न्यायालयात उपस्थित न राहणाऱ्या व्यक्तींविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याबाबत विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील 66 जणांना पकडून न्यायालयासमोर हजर केले आहे.

अजामीनपात्र, जामीनपात्र व पोटगी प्रकरणांमध्ये न्यायालयाने वारंवार समन्स जारी केल्यानंतर देखील काही मंडळी न्यायालयात हजर झाली नव्हती. अशा व्यक्तींसंदर्भात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. या संदर्भात नूतन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील 13 पोलीस स्थानक अंतर्गत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत 66 जणांना पकडून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. यामध्ये एका पोटगी प्रकरणाचा देखील समावेश आहे. प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी यापुढे देखील विशेष मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली आहे.













