हिंगोली- केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कायदा, सुव्यवस्था संदर्भात माहिती देण्याकरिता अधिकारी व अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातील 28 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 28 जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना प्रचलित कायदे व नियमाबाबत जागरूकता असावी याकरिता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार हे प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.

यामध्ये भरोसा सेलच्या सपोनी विशाखा धुळे, दामिनी पथकातील सपोनी शिंदे, पोलिस अंमलदार माधव बेले, आरती साळवे, शेख सलमा, अर्चना नखाते, वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पारस्कर यांचा प्रशिक्षणाकरिता समावेश करण्यात आला आहे.
या अनुषंगाने अद्याप पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा हट्टा, जवळाबाजार , औंढा नागनाथ, शिरड शहापूर, कुरुंदा, वाकोडी, मसोड या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वाहतुकीचे नियम, संकट काळातील सोबती 112 उपक्रम, गुन्हे प्रतिबंध, बालविवाह, मुलींची सुरक्षा संदर्भातील कायदे, दामिनी पथक, ऑनलाईन फसवणूक व सोशल मीडिया वापर या विषयांसंदर्भात प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या काळात उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम पार पडणार आहे.












