हिंगोली -बदलत्या काळानुसार संगणकीय क्षेत्रामध्ये रोजगार देखील बदलत आहेत. त्यामुळे वर्तमान आणि भविष्यात बदलत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन एमकेसीएलच्या वतीने रोजगारक्षम शिक्षण उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका विना कामत यांनी हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
जेव्हापासून भारतात संगणकीय युग सुरू झाले तेव्हापासून या क्षेत्रात सातत्याने बदल होत गेले आहेत. येणाऱ्या काळात देखील अशा प्रकारचे अनेक मोठे बदल होणार आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात 5 हजार केंद्रांच्या माध्यमातून युवकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संगणक शिक्षण विविध कोर्सेसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. केवळ शिक्षणच देणे आमचे कर्तव्य नसून प्रत्येक केंद्रावर प्लेसमेंट पोर्टल एक्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या माध्यमातून कोर्सेस शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला रोजगार कुठे उपलब्ध आहे याची देखील माहिती देण्यात येते. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता मोफत प्रशिक्षण देखील दिल्या जात आहे. ज्यामुळे विद्यार्थी भविष्यात कुठलेही आव्हानाला सामोरे जाऊ शकेल. घरातील प्रत्येकासाठी शिक्षण असावे या उद्देशाने पहिलीच्या विद्यार्थ्यापासून ते घरातील जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी एम के सी एलच्या वतीने विविध कोर्स उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विना गावित यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला त्यांच्यासह एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक महेश पत्रिके, कौशल, दीपक नेनवानी, ज्ञानेश्वर चव्हाण आदींची उपस्थिती होती.












