हिंगोली- येथून सुरू झालेल्या जनशताब्दी रेल्वेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार हेमंत पाटील यांचा जावई म्हणून उल्लेख करताना त्यांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. जावयाचा लाड पुरवावा लागतो नाहीतर तो महागात पडतो असे भावनिक उद्गार देखील काढले.
हिंगोली येथून रेल्वेच्या संदर्भात खासदार हेमंत पाटील हे माझ्याकडे वारंवार पाठपुरावा करतात. बरेचदा दिल्लीमध्ये ते समोर दिसले तर मला रस्ता बदलावा लागतो. परंतु काहीही झाले तरी त्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. शेवटी जावयाचा लाड पुरवावाच लागतो. उशिरा का होईना त्यांची मागणी मान्य करीत ही रेल्वे सुरू करण्याचा आनंद होत असल्याची भावना ना. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त करताना त्यांनी केलेल्या पाठपुरावाचे कौतुक देखील केले.












