हिंगोली- येलदरी धरणातून हिंगोली जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्यात यावा ही अनेक वर्षापासूनची जिल्हावासियांची असलेली मागणी पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर येलदरी धरणातून सेनगाव तालुका आणि हिंगोली जिल्ह्याकरिता पाणी उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्याला लागून असणाऱ्या येलदरी धरणाच्या निर्मिती वेळी हिंगोली जिल्ह्यातील जमीन या धरण क्षेत्रात गेली. परंतु या धरणातून मात्र जिल्ह्याला पाणी उपलब्ध झालेले नाही. भौगोलिक अडचणींचे कारण देऊन हा विषय टाळण्यात आला होता. परंतु वॉटर लिफ्टिंग किंवा कॅनॉलद्वारे हे पाणी जिल्ह्याला कसे मिळवता येईल या अनुषंगाने शासनाने सर्वेक्षण करून मार्ग काढावा अशी मागणी हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. याबाबत फडणवीस यांनी संबंधित विभागाला आदेश दिल्यानंतर येलदरी धरणातून पाणी उपलब्ध करण्याचे अनुषंगाने काय उपाययोजना करता येतील याबाबत सिंचन विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल दाखल झाल्यानंतर सुचविण्यात येणाऱ्या उपयोजनांच्या अनुषंगाने राज्य शासन निर्णय घेईल. सेनगाव सारख्या दुष्काळी तालुक्यात येलदरीचे पाणी उपलब्ध झाले तर मोठी जलक्रांती होईल असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.












