हिंगोली- आम्ही उंटावर बसून शेळ्या हाकणारे नसून रस्त्यावर उतरून जनतेत जात काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत अशी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
हिंगोली येथे आज रविवारी रामलीला मैदान येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वतीने राबविज्ञान येत असलेल्या विविध लाभार्थी योजना आणि त्याचे सकारात्मक परिणाम याबाबत विस्तृत माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्याच अनुषंगाने विविध बंधारे सिंचन उपक्रमांना मान्यता दिली आहे. राज्यात उद्योग निर्मिती वाढावी यासाठी प्रयत्न चालू असताना हिंगोली सारख्या मागास जिल्ह्यांमध्ये देखील उद्योग निर्माण व्हावेत व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण व्हावी याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी या कार्यक्रमात दिली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन आम्ही पाळले आहे. त्यामुळे मराठा समाजाने आमच्या निर्णयावर विश्वास ठेवून सहकार्य करावे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू भैया नवघरे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, विभागीय आयुक्त आरदड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कचवे , पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.











