हिंगोली- महायुतीमध्ये उमेदवाराच्या संदर्भात प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला असताना हेमंत पाटील यांना डावलून बाबुराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून उद्या गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर उमेदवारीच्या बाबतीत प्रचंड मोठा विरोध व्यक्त करण्यात आला होता. या विरोध नंतर हदगावचे बाबुराव कदम कोहाळीकर यांचे नाव चर्चेत आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्रीताई पाटील यांना वाशीम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर येत असून बाबुराव कदम यांच्या उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल मंगळवारी हेमंत पाटील समर्थकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारी कायम ठेवण्यासंदर्भात विनंती केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबुराव पाटील यांची उमेदवारी अंतिम मानली जात असली तरी ऐनवेळी नवीन घडामोडी घडण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवार हा हिंगोली हिंगोलीच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.
ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आल्यामुळे या प्रकरणाचा अप्रत्यक्षपणे फटका महायुतीला बसण्याची शक्यता देखील वरती जात आहे.












