हिंगोली- एकीकडे प्रचाराची जोरात धामधूम सुरू असताना महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचाराकरिता अनेक नेते मंत्री हिंगोली दौरा करीत आहेत. परंतु विकास कामांना १५ टक्क्यांचे ढक्कन लावणारे पालकमंत्री अब्दुल सत्तार मात्र प्रचारातून गायब असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचाराकरिता मंत्री उदय सामंत यांचे हिंगोली दौरे सुरू आहेत. या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे गटाचे अनेक नेते प्रचाराकरिता जिल्हा दौरा करीत आहेत. परंतु पालकमंत्री अब्दुल सत्तार हे या प्रचारापासून दूर आहेत की जाणीवपूर्वक त्यांना दूर ठेवण्यात आले आहे हे समजण्यास मार्ग नाही.
सुरुवातीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या निमित्ताने सत्तार यांनी व्यासपीठावर हजेरी लावली परंतु त्यानंतर मात्र सत्तार हिंगोली कडे फिरकले नाहीत. हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन पार पडलेल्या बैठकीमध्ये निधीच्या टक्केवारीवरून पालकमंत्र्यांना चांगलेच सुनावले होते. या प्रकारामुळे जिल्हा नियोजन मध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला होता. पालकमंत्र्यांनी विकास निधीला 15% चे ढक्कन बसविल्याने जिल्ह्यातील विकास कामांवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. याबाबत महायुती मधील भाजप पक्षाचे नेते व कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. एकतर्फी कारभार सुरू असल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी देखील पातळी सोडून भाषा वापरली होती. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेवरून हा वाद निवळला होता. आता लोकसभा प्रचाराची धामधूम सुरू असताना महायुती कडून मात्र प्रचाराकरिता पालकमंत्री सत्तार यांना अजूनही उतरविण्यात आलेले नाही. यामागचे नेमके कारण काय? याबद्दलही उलट सुलट चर्चा झाडू लागली आहे. शिवाय मागील वर्षभरात जिल्हा नियोजन विकास निधी मधून झालेल्या कामांच्या दर्जाचा विषय देखील या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो.












