हिंगोली – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जिल्ह्यातील देशी माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गाव पोहोच दारू विक्री सह सर्वच नियम पायदळी तुडविले जात आहेत. याकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असताना दिसून येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या देशी दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांना नियम अटी घालून देण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये देशी दारूचे दुकान उघडण्याची वेळ सकाळी आठ वाजताची निश्चित करण्यात आली असून रात्री दहा वाजता दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु मद्यपींच्या सेवेत हजर असणारे देशी दारू विक्रेते काही ठिकाणी पाच वाजता तर काही ठिकाणी सहा वाजता दुकान उघडून तयार असतात. तर रात्री अकरा किंवा बारा वाजे पर्यन्त दुकान चालू ठेवण्यात येत असते.
किमान विक्री मूल्य म्हणजे एमआरपी पेक्षा अधिक दराने देशी दारू विक्री करण्यास सक्त मनाई असताना जिल्ह्यातील बहुतांश देशी दारू दुकानांवर प्रत्येक बाटली मागे दहा ते पंधरा रुपये अतिरिक्त आकारले जातात. या प्रकारातून दर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या पाठोपाठ अवैध पद्धतीने गाव पातळीवर देशी दारू पुरविणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत झालेली आहे. या यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात देशी दारू विक्री बोकाळली आहे. देशी दारू विक्रेत्यांना अशा प्रकारे ठोक दारू विक्री करण्यास मनाई असताना इतक्या मोठ्या प्रमाणात गाव पातळीवर दारू कशी पोहोचते ? याचा तपास अजूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागलेला नाही.
विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगून वर्षभरात थातूरमातूर कारवाया केल्या जातात. दुसरीकडे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात अनेक कारवाया होत असल्या तरी ज्या देशी दारू दुकानदारांकडून अशा प्रकारची दारू पुरविली जात आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राज्य उत्पादन शुल्कला असला तरी प्रत्यक्षात कागदावर मात्र कुठल्याही स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही. ग्रामीण भागात बोकाळलेला देशी दारूचा व्यवसाय महिन्याला लाखो रुपयांच्या उलाढालीमध्ये पोहोचला आहे. याला नेमका कोण आशीर्वाद देत आहे ? राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक का करीत आहेत ? अवैध विक्री करणाऱ्यांच्या संपर्कात कोणते कर्मचारी आहेत ? याचा तपास लागल्यास महिन्याकाठी होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीचे बिंग फुटेल.
ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांमध्ये सहजपणे दारू उपलब्ध होत असल्यामुळे तरुणांचे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर बाबीकडे देखील दुर्लक्ष होऊ लागले आहे.












