हिंगोली- राज्यात पुणे येथील प्रकरण गाजत असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र याबाबतीत कुठलेही गांभीर्य घेण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील बहुतांश बियर बारवर तसेच वाईन शॉपीवर अल्पवयीन मुलांना बिनधास्त मध्य विक्री सुरू आहे. संबंधित बारचालकांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
पुणे येथे कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत केलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करण्यासंदर्भातचा मुद्दा राज्यभर गाजू लागला आहे. या अनुषंगाने पुण्यातील अनेक बियर बारवर कारवाई देखील करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या नियमानुसार 21 वर्षाखालील मुलांना मद्य विक्री करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. असा प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्याचे प्रावधान देखील करण्यात आलेले आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यामध्ये असलेल्या बहुतांश बियर बार, बिअर शॉपी आणि वाईन शॉपीवर सर्रासपणे अल्पवयीन मुलांना मध्ये विक्री केल्या जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडून किती कारवाया झाल्या याबाबत अनभिज्ञता आहे. एवढेच नव्हे तर बेकायदेशीरपणे गाव परत देशी दारू पोचविण्याचा जो मोठा उद्योग बोकाळला आहे त्यामुळे देखील ग्रामीण भागात अल्पवयीन मुले व्यसनाधीन होण्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. जिल्ह्यातील बारचालकांकडून दरमहा अर्थपूर्ण हिशोब ठेवल्या जात असतो. एवढेच नव्हे तर परवाना नूतनीकरणांमध्ये देखील संबंधित विभागाचे कारकून विशिष्ट अर्थपुर्णता ठरवून घेत असतात. सदरील बाब वरिष्ठांना माहीत असून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकारात नेमके कोण कोण सहभागी आहेत ? यावर देखील आता उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकारी तरी याकडे लक्ष देतील काय असा प्रश्न निर्माण होत आहे.












