हिंगोली – लोकसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा जमिनीवर बसतो न बसतो तोच विधानसभा निवडणुकीवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि तर्क वितर्कनां उधान आले आहे. दोन्ही बाजूकडून कोण अधिक सक्षम राहील याचा अंदाज घेताना नवनवीन इच्छुक आणि भविष्यातील दावेदार ठरणारे यांची नावे देखील समोर येऊ लागली आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोली विधानसभेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्यामुळे महायुतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्रचंड मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असताना दुसरीकडे मात्र महायुतीत चिंता निर्माण झाली आहे. हिंगोली विधानसभेत महायुतीच्या मधून भारतीय जनता पार्टीचे तानाजी मुटकुळे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्ष तानाजी मुटकुळे यांना संधी देईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. परंतु भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी लोकसभेपूर्वी ज्या पद्धतीने तंबी दिली होती त्यानुसार विचार केला तर भाजप या ठिकाणी देखील उमेदवार बदलाचा विषय करू शकतो असा अंदाज वर्तविला जाऊ लागला आहे. ज्यामध्ये पक्षात तानाजी मुटकुळे यांच्या व्यतिरिक्त पर्यायी उमेदवारीचा विचार करण्याच्या अनुषंगाने हिंगोली नगरपालिकेत उल्लेखनीय काम करणारे तसेच अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचा पाया रचणारे, शिवाय लोकसभा निवडणुकीत प्रबळ दावेदार असताना पक्ष हितासाठी माघार घेणारे रामदास पाटील यांचा विचार होऊ शकतो असा मुद्दा देखील सोशल मीडियावर रंगविल्या जात आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या माध्यमातूनच रामदास पाटील यांचा भाजप प्रवेश झालेला आहे. एका अर्थाने मुटकुळे हे रामदास पाटलांचे राजकीय गुरु असले तरी पक्षाने बदलाचा विचार केला तर हा निर्णय देखील होऊ शकतो. पाठोपाठ भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांच्या नावाबद्दल देखील सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता आणि व्यक्ती म्हणून शिंदे हे लोकांच्या पसंतीस उतरतील असा तर्क देखील या माध्यमातून लावल्या जात आहे. तूर्तास तरी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबतीत काय निर्णय होतील ? याकडे संपूर्ण महायुतीचे लक्ष लागले आहे. हिंगोली विधानसभेत एकनाथ शिंदे शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडून कुठलाही प्रबळ दावा होण्याची शक्यता दिसून येत नाही.
महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निकालावरून मोठा उत्साह निर्माण झाला असला तरी याच उत्साहामुळे अनेक जण प्रबळ इच्छुक म्हणून कामाला लागल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीत सलग तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचाच दावा अधिक प्रबळ आहे. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेला इच्छुक असलेल्या रूपालीताई पाटील गोरेगावकर यांचा देखील दावा असणार आहे. याच गटाचे तरुण जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी देखील आपल्या समर्थकांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून विधानसभेसाठी दावेदारी सुरू केली आहे. शिवाय रमेश शिंदे हे देखील काही वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून विधानसभे करिता आपली मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी याकरिता प्रबळ दावा निर्माण करीत माजी सभापती प्रकाश थोरात, माजी नगराध्यक्ष सुधीर आप्पा सराफ यांनी मतदार संघात बॅनरबाजी सह भिंती रंगवण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचे देखील नाव सोशल मीडियातून चर्चेत आले असले तरी स्वतः पतंगे मात्र याबाबतीत सक्रिय दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा केवळ सोशल मीडिया पुरती मर्यादित राहिली आहे. एकंदर महायुती मधून पर्यायी म्हणून भाजपमधील रामदास पाटील, फुलाजी शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवारीवरून इच्छुकानी दावेदरांची संख्या जोरदार वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्हीही बाजूचे पक्ष येणाऱ्या काळात काय निर्णय घेतात याची उत्कंठा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.












