हिंगोली- जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे न्यूज माध्यमाच्या वतीने काढण्यात आल्यानंतर आज हिंगोली बार लिकर असोसिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांना पाठविलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये जिल्ह्यात एफ एल दोन अनुज्ञप्ती ग्राहकांच्या दुकानातून सर्रासपणे विदेशी बनावट मध्याची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
हिंगोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भोंगळ कारभाराचे वाभाडे न्यूज माध्यमिक काढले होते. परंतु गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही. अखेर आज हिंगोली बार लिकर असोसिएशनने सादर केलेल्या निवेदनामध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये जिल्ह्यात एफ एल तीन परवानाधारक असलेले अनुज्ञप्ती धारक हे स्वतःचे परवाना वाईन शॉप असल्याचा दाखवून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. त्याचबरोबर परवाना मंजुरी दरम्यान दाखविलेल्या नकाशामध्ये मोठा फेरबदल करून नियमांचे उल्लंघन केले आहे. मुख्य रस्त्यापासून एफ एल तीन अनुज्ञप्ती धारकांनी सदर दुकानाची जाहिरात करू नये किंवा मुख्य रस्त्यापासून स्पष्ट दिसण्यात येऊ नये हा उच्च न्यायालयाचा आदेश असताना त्याची सर्रासपणे पायमल्ली केली आहे. या प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
त्याचबरोबर शासन निर्देशाप्रमाणे ग्राहकांसाठी बसण्याची, जेवणाची, तसेच शौचालय अशा सुविधा असणे बंधनकारक असताना याचे कुठेही पालन केलेली दिसून येत नाही. गैर कायदेशीररित्या वाईन शॉप सारखी अवैध सीलबंद बॉटल पार्सलच्या स्वरूपात देण्यात येत आहे. सदर अनुज्ञाप्ती धारकांना नियमानुसार परवाना असणाऱ्या व्यक्तींनाच मद्य देण्याचा नियम असताना याबाबतीत अज्ञात मुलांना देखील सर्रासपणे मद्य विक्री केल्या जात आहे. सीलबंद बॉक्स देखील सहजपणे पार्सलच्या स्वरूपात विक्री होत असून त्याची ग्रामीण भागातील गावांमध्ये अवैध विक्री बोकाळली आहे.यामुळे अज्ञान मुले देखील व्यसनी होऊ लागले आहेत. शासन नियमानुसार अनुज्ञप्ती धारकांना सिमेंटचे बांधकाम बंधनकारक असताना तीन शेडमध्ये दुकान थाटून दारू वितरित केल्या जात आहे. तक्रारी केल्यानंतर याबाबत मात्र थातूरमातूर कारवाई करून दंड लावला जातो. बेकायदेशीर विक्रीमुळे ग्राहकांची आणि शासनाची कर चोरी देखील होऊ लागली आहे. हा प्रकार माहित असताना देखील राज्य उत्पादन शुल्क याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील एफ एल दोन अनुज्ञप्ती दुकानांमधून सर्रासपणे बनावट विदेशी मद्याची विक्री सुरू असल्यामुळे त्याचा शासनाच्या महसुलीवर मोठा परिणाम होत आहे. हिंगोली शहरातील काही बारच्या शेजारी असणाऱ्या घरांमधून तसेच टपरीवरून बिनबोभाट मद्य विक्री सुरू आहे. ज्यामध्ये उत्पादन शुल्क विभागा सोबत संगणमत करून देशी व विदेशी मद्याची अवैध विक्री केल्या जात आहे. त्यामुळे याची दखल घेऊन बेका बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्ती परवाने बंद करण्यात यावे अन्यथा एक जुलैपासून सर्व बार लिकर चालक आपल्या अनुज्ञप्ती कुलूप लावून बंद करीत त्याच्या चाव्या जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदन देताना बार लिकर असोसिएशनचे आकाश कदम, राजेश बांगर, विजय तांदळे, रवी बांगर, श्याम दराडे , शैलेश बांगर, माधव बांगर, सतीश मुसळे, संजय कदम आदींची उपस्थिती होती.












