हिंगोली – समाजकारणात सक्रिय झाल्यापासून मी नेहमीच व्यापारी आणि कामगारांना न्याय देण्यासाठी झगडत आलो आहे. यापुढे देखील मी तुम्हाला संरक्षण देण्यास कटिबद्ध असेल असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी शहरातील मोंढा भागात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कपाट या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवीत असलेले रामदास पाटील यांनी आज शहरातील मोंढा परिसरात भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. आज पर्यंत शहरातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या व्यापाऱ्यांचा केवळ स्वार्थासाठी वापर करण्यात आला. प्रत्यक्षात व्यापारी अडचणीत असल्यावर मात्र त्यांच्या पाठीशी कोणीही उभे राहिले नाही. माझ्या आजपर्यंतच्या कार्यकाळात अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांमध्ये मी माझे कर्तव्य म्हणून सहकार्य केले. भविष्यात देखील शहरातील व्यापारी आणि कामगार यांच्यासाठी सदैव उपलब्ध राहील. त्यामुळे सर्वांनी मला या विधानसभेत प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.












