हिंगोली – सध्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात झालेली परिस्थिती गाजत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात फार काही वेगळी परिस्थिती नाही. यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आवाज उठविण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्यासाठी 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या नंतर प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी सलग दोन दिवस जिल्ह्यातील तालुक्यांचा आढावा घेत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर त्यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून यश मिळाले. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत आम्हाला मतदान जास्त मिळाले परंतु काही कारणांमुळे आम्हाला विजय मिळविता आला नाही. खचून न जाता शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आमच्याच पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज झालो असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार संतोष टारफे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकताना हिंगोलीची परिस्थिती बीड सारखे बनत चालली आहे. रेती माफिया जुगार अवैध धंदे एवढेच नव्हे तर खून आणि गोळीबाराचे प्रकार देखील वाढत चालल्यामुळे यावर मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष देऊन जिल्ह्याची परिस्थिती सुधारावी अशी मागणी त्यांनी केली. पाठोपाठ माजी खासदार शिवाजीराव माने यांनी देखील हाच मुद्दा धरत कठोर शब्दांमध्ये टीका करताना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या या परिस्थितीकडे लक्ष द्यायला वेळ आहे की नाही असा सवाल देखील उपस्थित केला. येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे देखील शिवाजी माने यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपू पाटील, राजेश पाटील गोरेगावकर, वसीम देशमुख, तानाजी जाधव, सुनील काळे, परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












