हिंगोली -जिल्ह्यातील संघटनेचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यासमोर आज जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात चांगलीच खदखद व्यक्त केली. यामुळे संपर्कप्रमुखांची देखील डोकेदुखी वाढल्याचे पहावयास मिळाले.
लोकसभा निवडणुकीत विजयासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जीवाचे रान केले. परका उमेदवार लादल्यानंतर देखील शिवसैनिकांनी निष्ठा बाळगून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देत नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय खेचून आणला. परंतु विजयी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतील बोटावर मोजण्या येतील एवढ्या सभांमधील उपस्थिती सोडता अष्टीकर कुठेही दिसून आले नाहीत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. एकही आमदार कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यात राहिला नाही. अशा परिस्थितीत एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आष्टीकर यांच्याकडे शिवसैनिक डोळे लावून बसले होते. ग्रामीण भाग तर सोडाच परंतु हिंगोली सारख्या मुख्यालयाला देखील भेट देण्याचे औचित्य खासदार महोदयांनी दाखविले नाही. विधानसभा निवडणुकीत खचलेल्या शिवसैनिकांना आधार देण्याची गरज असताना आष्टीकर मात्र बेपत्ता झाले आहेत. शिवसैनिक असो की पदाधिकारी अनेकांचे फोन देखील उचलल्या जात नसल्याची खदखद आज संपर्कप्रमुखांसमोर मांडण्यात आली. विधानसभेतील पराभवानंतर पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी संपर्कप्रमुख बबन थोरात जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी हिंगोली, औंढा व कळमनुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी सर्वच शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी खासदारांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे संघटनेच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला सहसंपर्कप्रमुख तसेच खासदार असलेले आष्टीकर गैरहजर होते. कार्यकर्त्याची भावना ऐकून संपर्कप्रमुख देखील अचंबित झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी संपर्कप्रमुख बबन थोरात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












