हिंगोली पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी
हिंगोली- औंढा तालुक्यातील नागेश वाडी शिवारात सापडलेल्या अज्ञात तरुणीच्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर हिंगोली पोलिसांना यश आले आहे. मृतदेहजावळ जवळ सापडलेल्या डी मार्टच्या बिलावरून तपास करीत पोलिसांनी मुख्य आरोपीला आदिलाबाद येथून ताब्यात घेतले आहे.
दिनांक 24 डिसेंबर रोजी औंढा तालुक्यातील नागेश वाडी शिवारात एका 25 ते 30 वर्षे युवतीचे प्रेत आढळून आले होते. सदर प्रेताची ओळख पटविण्यासाठी हिंगोली पोलिसांनी अनेक प्रयत्न केले परंतु सदरील गुन्ह्याचा तपास लागत नव्हता. तरुणीच्या अंगावर जखमा असल्यामुळे सदर प्रकार हा खुनाचा असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व औंढा नागनाथ पोलीस यांच्या पथकामार्फत तपास सुरू केला. घटनास्थळावर पोलिसांना संभाजीनगर येथील डी मार्टचे एक बिल सापडले होते. सदरील बिलावर उल्लेख असलेल्या नावावरून पोलिसांनी समाज माध्यमांचा आधार घेत सदरील तरुणीची ओळख पटविली. सदर तरुणी ही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील असून तिचे नाव अलका बाजीराव बेद्रे वय 29 वर्ष असल्याचे निष्पन्न झाले होते. सदरील तरुणीचे आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार वय 24 वर्ष राहणार मुघट, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड याच्याशी बीड – संभाजीनगर प्रवासादरम्यान ओळख झाली. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. त्यानंतर सदरील तरुणीने त्यास लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार दोघेही संभाजीनगर येथील लाडगाव येथे भाड्याच्या रूमने रूममध्ये राहत होते. दिनांक 23 डिसेंबर रोजी आरोपी श्रीकांत याने तिच्याशी झालेल्या वादातून अलकाचा खून केला. त्यानंतर तिचे प्रेत एका सुटकेसमध्ये टाकून प्रवासी वाहनाद्वारे जालना परिसरात आणले याच परिसरात तिचा मृतदेह फेकण्याच्या विचारात असताना पुन्हा विचार बदलून तो औंढा तालुक्यातील नागेश वाडी शिवारात पोहोचला या ठिकाणी त्याने रात्री तिचे प्रेत फेकून आदिलाबाद येथे कडे पोबारा केला. दरम्यान अतिशय किचकट असलेल्या या तपास प्रकरणामध्ये पोलिसांनी तांत्रिक शोधाचा वापर करीत आरोपीचा माग काढला. पोलीस पथकांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व औंढा पोलीस यांच्या पथकांना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रत्येकी 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदरील तरुणीच्या नातेवाईकांना माहिती कळविण्यात आली असून लवकरच तिचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील तपासामध्ये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अंबादास भुसारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश राहिरे,सोपोनी संतोष शेकडे, शिवशंभ घेवारे, विक्रम विठूबोने, माधव जीवारे, कपिल आगलावे, अंमलदार पांडुरंग राठोड , कोंडीबा मगरे, विक्रम कुंदननानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, आकाश टापरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इमरान सिद्दिकी, इकबाल शेख, मदार शेख यांनी कामगिरी बजावली.












