हिंगोली- मागील काळामध्ये एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्याचे मंत्री भूषविले परंतु त्यांचा कार्यकाळ पाहता यावेळी शोषण करणारा की जिल्ह्याचे पोषण करणारा पालकमंत्री येणार याबाबत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांना शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने अल्पसंख्यांक मंत्रीपदाचे खाते दिले त्यानंतर हिंगोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर ठेवली. परंतु पालकमंत्री म्हणून सत्तार यांचा कार्यकाळ अतिशय वादग्रस्त राहिला. जिल्हा विकास निधीला त्यांनी लावलेले ढक्कन 15 टक्क्यापर्यंत पोहोचल्यानंतर विकास निधीचा निव्वळ बाजार मांडला गेला. या माध्यमातून झालेली सर्व कामे कोणत्या दर्जाची केली आहेत जनतेला सांगायचा विषय राहिलेला नाही. याचाच फटका लोकसभा निवडणुकीत बसला. एवढेच नव्हे तर त्यावेळचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा विकास निधीच्या ऑनलाइन बैठकीमध्ये सत्तार यांच्या बाजारू कारभाराचा वाभाडा काढला होता. स्व पक्षातून आहेर मिळून देखील सत्तार यांनी आपल्या भूमिकेत शेवटपर्यंत बदल केला नाही. परिणामी येणाऱ्या मंत्रिमंडळातून सत्तार यांचा पत्ता कापल्या जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दुसरीकडे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी अग्रेसर राहणारे हेमंत पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आलेले आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती युती शासनाच्या काळात 1999 ला झाली. या जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री म्हणून जयप्रकाश मुंदडा व जयप्रकाश दांडेगावकर लाभले त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपलेला नाही. ही परिस्थिती पाहता यावेळी तरी जिल्ह्याला स्वतःचा पालकमंत्री मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय जो पालकमंत्री जिल्ह्यासाठी मिळेल तो जिल्ह्याचे पोषण की शोषण करेल यावरही खूप मोठी चर्चा रंगू लागली आहे. मंत्री पदाच्या बाबतीत हेमंत पाटील यांचे नाव अग्रेसर होऊ लागल्यानंतर जिल्हा वाशियांच्या अशा पल्लवीत झाल्या असून अभ्यासू व्यक्तिमत्व मंत्री म्हणून लाभल्यास याचा जिल्हा मोठा फायदा होईल असा विश्वास देखील व्यक्त होऊ लागला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांची विधान परिषदेच्या गटनेते पदी निवड झाल्यामुळे त्यांना निश्चितच मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे असे झाले तर जिल्ह्याला प्रथमच अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला पालकमंत्री मिळेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.












