हिंगोली- शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रम वारंवार सूचना देऊन देखील राबविण्यात येत नसल्यामुळे चक्क प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना पत्र सादर करीत 11 ऑक्टोंबर पासून शाळेसमोर लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा दिल्यामुळे ऐकावे ते नवलच अशी चर्चा रंगू लागली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने निपुण महाराष्ट्र, एक पेड माँ के नाम, विद्यार्थी सुरक्षा समिती असे विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. या संदर्भात हिंगोली शहरातील अंतुले नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांच्याकडून सदरील उपक्रमाबाबत असमाधानकारक प्रगती, माहिती अपूर्ण ठेवणे, लिंक द्वारे माहिती न भरणे असे प्रकार समोर आले आहेत. मुख्याध्यापकाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी संबंधित मुख्याध्यापकांना पत्र लिहीत आपण दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शाळेसमोर लक्षवेधी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात न्यूज माध्यमने शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई करायची झाल्यास मुख्याध्यापकांसह इतर शिक्षक कर्मचाऱ्यांवर प्रस्तावित करावी लागेल. परंतु या संवेदनशील विषयाला मुख्याध्यापकांनी गांभीर्याने घ्यावे याकरिता आपण असा इशारा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान थेट शिक्षणाधिकाऱ्यांनीच उपोषणाची भूमिका घेतल्यामुळे या आश्चर्यजनक बातमीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.












