हिंगोली- येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार जेव्हापासून विष्णू भोजे यांच्याकडे देण्यात आलेला आहे, तेव्हापासून पंचायत समिती कार्यालयामध्ये दलाल सक्रिय झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे विविध लाभाच्या योजनांच्या अनुषंगाने वेगवेगळे दलाल काम करताना दिसून येत आहेत. स्वतः लाभार्थी थेट अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचला तरी त्यांच्या फाईल पुढे सरकत नाहीत. तर दुसरीकडे दलालांच्या मार्फत संपर्क साधल्यानंतर काही दिवसातच प्रकरण मार्गी लागत आहे. यामुळे पंचायत समितीमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कारभारी आहेत की दलाल कारभारी आहेत ? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये दलालांनी अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करून अर्थपूर्ण संबंध निर्माण करीत बिनदिक्कतपणे आपला कारभार चालवला आहे. यामध्ये मात्र सर्वसामान्य लाभार्थी आणि नागरिकांची मात्र लूट होत असल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन पंचायत समिती मधील दलालांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.












