हिंगोली- संतोष बांगर यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यानंतर कळमनुरीच्या नागरिकांसोबत गद्दारी केली त्यामुळे ते केवळ गद्दारी करू शकतात विकास नाही. अशी परखड टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते विनायक भिसे यांनी हिंगोली येथे बोलताना केली.
महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उबाठा गटाच्या अर्चनाताई श्रीराम भिसे यांची उमेदवारी जाहीर होताच विनायक भिसे यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेत बार उडवून दिला. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार कोण राहणार याबाबत अनेक शक्यता वर्तविल्या जात होत्या. परंतु आज रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस पक्ष, शरद पवार काँग्रेस गट यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीने अर्चनाताई श्रीराम भिसे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच विनायक भिसे यांनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर जहरी टीका केली. संतोष बांगर यांनी कळमनुरीच्या विकासासाठी 26 कोटी रुपयांचा तर हिंगोलीच्या विकासाकरिता 100 कोटी रुपयांचा निधी आणल्याची घोषणा केली होती. ज्या मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहेत त्या मतदारसंघाच्या मतदारांसोबत देखील तुम्ही इमानदारी ठेवू शकत नाहीत आणि आणलेल्या निधीचे कामे जवळच्याच व्यक्तींना दिले जातात किंवा जिल्ह्याबाहेरील गुत्तेदार ही कामे करत आहेत. त्यामध्ये देखील प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहशत आणि दादागिरीचे वातावरण तयार केल्या जात आहे. जिल्ह्याची स्थिती बीड जिल्ह्यासारखी होऊ लागली आहे आणि हे थांबवायचे असेल तर अशा गद्दार माणसांना जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली असून हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या मशाल चिन्हावर मतदान करून मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.












