हिंगोली- नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवार अर्चना ताई श्रीराम भिसे यांच्या व आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज शहरातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये ढोल ताशे व महाविकास आघाडीतील पक्षांचे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली पोस्ट ऑफिस, जवाहर रोड, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे काढण्यात आली. रॅलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार संतोष टार्फे, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, जिल्हाप्रमुख गोपू पाटील, विनायकराव भिसे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, मिलिंद उबाळे, विनायकराव देशमुख, मुजीब पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. ही निवडणूक आता सामाजिक न्याय घडवणारी झाली असून सर्व जनता विरोधकांना जागा दाखवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करेल असा विश्वास खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केला.












