हिंगोली- अकोला- पूर्णा मार्गावरून मंजूर झालेली जालना – छापरा रेल्वे सुरू करण्यात यावी, हिंगोली मार्गे थेट मुंबई जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध करण्यात यावी, हिंगोली येथील रेल्वेच्या जागेवर गुड शेड भरण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आज रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संपूर्ण जिल्हाभरातून पाठिंबा मिळाला. आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिष्टमंडळाला चर्चेचे निमंत्रण दिले असून यातून काय निष्पन्न होते, त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

हिंगोली – अकोला मार्गाचे रुंदीकरण पूर्वीच झाले असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाले आहे. असे असताना रेल्वे विभागाच्या वतीने या मार्गावर वारंवार अन्याय करण्यात येत आहे. मार्गावर मंजूर झालेल्या रेल्वे देखील इतर मार्गाने वळविण्यात येत आहेत. तर चालू असलेल्या रेल्वे बंद करण्याचे पराक्रम सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या मार्गावर मंजूर झालेली जालना – छापरा रेल्वे इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे संतापलेल्या हिंगोलीकरांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज संपूर्ण हिंगोली बाजार पेठ बंद ठेवण्यात आली होती. शहरातील गांधी चौकात रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने उपस्थित असलेल्या मान्यवरांनी रेल्वेच्या विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सर्व नागरिकांनी रेल्वे स्थानकावर धडक मारली.

यावेळी स्थानिक पोलीस व रेल्वेच्या पोलिसांनी नागरिकांना अडविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची देखील झाली. अखेर गनिमीकावा पद्धतीने हिंगोलीकरांनी स्थानकावर प्रवेश मिळवून रेल रोको आंदोलन केले.
दरम्यान हिंगोली शहर बंद व रेल रोको आंदोलन होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना समजताच त्यांनी रेल्वे संघर्ष समितीचे गजानन घुगे यांना दूरध्वनीवरून चर्चा करीत शिष्टमंडळासह भेटून यावर तोडगा काढण्याची विनंती केली. येणाऱ्या काळात या पद्धतीने चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल असा निर्णय रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये हिंगोली शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.












