हिंगोली- जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हेगारांवर हद्दपरी सारख्या विशेष कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा नूतन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी आज गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिला.
यापूर्वी गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. अनेकदा कारवाई करून देखील गुन्हेगारांकडून गुन्हे करण्याचे थांबत नाहीत. अशा गुन्हेगारांची नोंद घेऊन त्यांच्यावर हाद्दपारी सारख्या विशेष कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहेत. विभागाअंतर्गत अधिक योग्य तपास व्हावा याकरिता तपास करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष रिवॉर्ड जारी केले जाणार आहेत. या माध्यमातून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.
अवैध दारू, जुगार, मटका यांसारख्या व्यवसायांवर कारवाई केली जात आहे. प्रलंबित गुन्ह्यांचे तपास निकाली काढण्याचे अनुषंगाने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती देखील जी श्रीधर यांनी दिली.
त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याचा उद्देशाने लोक सहभागातून टीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
पत्रकारांनी हिंगोली शहरातील गलथान वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भात माहिती दिल्यानंतर याबाबत आपण स्वतः लक्ष घालून कारवाई करू अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि शिवशंभ घेवारे, सपोनि राजेश मलपिल्लू आदि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.












