हिंगोली- दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे सेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार बंडु जाधव व शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे या तिघांनी उपस्थिती लावल्यामुळे दिल्लीत ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे सेनेचे दोन खासदार उपस्थित राहिल्यामुळे आष्टीकर शिंदेंच्या सेनेत दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून याबाबत मात्र अष्टीकरांनी अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबविल्या जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. सदरील भोजनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. परंतु यानंतर देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार बंडु जाधव व शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर अष्टीकरांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गटाचे दोन खासदार उपस्थित होते. दरम्यान नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांना स्नेहभोजनानिमित्त आमंत्रित केल्यानंतर त्यांचा सत्कार करून त्याचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. परंतु एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांचे फोटो मात्र प्रसारित केले नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्लीत ऑपरेशन टायगर राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार गळाला लावल्या जात असल्याची चर्चा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, संजय राऊत हे दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या घडामोडी पाहता लवकरच काहीतरी घडणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. दरम्यान या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खासदार आष्टीकर यांनी मात्र अद्याप आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नेमके काय घडणार ते लवकरच समोर येणार आहे.












