हिंगोली- मागील दौऱ्याच्या वेळी पत्रकारांनी चांगलाच समाचार घेतलेल्या पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी नुकतेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दौरा करताना काही पत्रकारांना पाकिटातून हिरवळ पोहोचवीत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त धावत्या जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना टीकेला चांगलेच सामोरे जावे लागले होते. त्यापूर्वी देखील त्यांनी आपण गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री झालो आहोत अशी हि हिनावणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त झिरवळ यांचा हिंगोली दौरा पार पडला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांचा राग शांत करण्यासाठी एका ‘कोल्ह्याला’ कामाला लावण्यात आले. सदरील ‘कोल्ह्या’च्या मार्फत काही इलेक्ट्रॉनिक मीडिया व काही प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना पाकिटातून हिरवळ पोचविण्यात आली. याचा परिणाम म्हणून अनौपचारिक चर्चेदरम्यान काही पत्रकारांनी पालकमंत्र्यांचे गरजेपेक्षा जास्तच कौतुक केले. आपल्या चुका झाकण्यासाठी माध्यमांसाठी लावलेली ही फिल्डिंग आता जोरदार चर्चा धरू लागली आहे. तसेच यापुढे पाकीट पत्रकारिता प्रकार देखील जोरात वाढण्याची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे हिरवळीचा हा प्रकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील माहित नसल्याचे समोर येत आहेत.












